11 Aug

अमेरिकेचे ग्रामीण जीवन साकारणारी – गावाकडची अमेरिका

गावाकडची अमेरिका Book Cover गावाकडची अमेरिका
डॉ. संजीव चौबळ
ललित लेखन
पूजा प्रकाशन
300

सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण.

 

अमेरिका म्हटलं की डोळ्यासमोर येतात गगनचुंबी इमारती, भव्य शॉपिंग मॉल्स, स्वच्छ आणि प्रशस्त रस्ते, सुसाट वेगाने धावणार्‍या मोटारी, सिलिकॉन व्हॅली, हॉलिवूड, डिस्नेवर्ल्डची स्वप्नमयी दुनिया, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झाहटसारख्या फास्टफूड चेन्सचं उगमस्थान.

 

न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजे काही अमेरिका नाही. या मोठ्या, अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक – अशी ही ग्रामीण अमेरिका.

 

दहा वर्षाहून अधिक काळ नोकरीनिमित्ताने अमेरिकेच्या ग्रामीण भागात, आडवाटेच्या लहानशा गावांत, शहरी सुखसोयींपासून दूर, वास्तव्य करताना लेखकाने सहकुटुंब ही “गावाकडची अमेरिका” जवळून बघितली, अनुभवली. पर्यटकांच्याच नाही तर अगदी अमेरिकेत वर्षानुवर्ष वास्तव्याला असलेल्या भारतीयांच्याही वाट्याला सहसा न येणारा ग्रामीण अमेरिकन जीवनाचा हा अनुभव शब्दबद्ध केला आहे “डॉ. संजीव चौबळ” या मुळच्या मुंबईकर पशुवैद्यकाने.

 

अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या मराठी लोकांना ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू उमजावा आणि भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना वास्तवाचे थोडे भान यावे हाही या मागचा एक उद्देश.